आज सापडलेलं उद्याचं सूत्र

आज शिवजयंती. सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
सकाळपासून प्रत्येकजण सोशल नेटवर्क व 'राजे परत या, राजे परत या' असं टाकतोय. खरं पाहता यात वावगं काहीच नाही हो. पण आजचा हा असला महाराष्ट्र पाहण्यासाठी म्हणून राजांनी का परत यावं?
सकाळी नुसतीच डी जे वर महाराजांची गाणी पण आचरण काय, तर शून्य! काल काहींचे मेसेजेस आले; तसे दरवर्षीच येतात, कि येत्या शिवजयंतीला शिवरायांचा फोटो डीपी म्हणून ठेवा आणि श्रीमंत योगी हे स्टेटस असू द्या, वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. पण अहो फक्त रेकॉर्ड बनवायचा म्हणून राजांचा फोटो ठेवायचा? आपल्या आतून, उस्फुर्त असं काहीच नाही का?
दरवर्षी फक्त शिवजयंतीलाच उत्साह दिसतो आणि दुसऱ्या दिवसापासून मग पुन्हा महाराष्ट्रात 'जैसे थे' हेच दिसतं. का अजूनही समोरून जाणाऱ्या मुलीला पाहून गाड्यांचे हॅंडल्स वळतात? का अजूनही एखादी स्त्री तिला हवे तसे कपडे घालून वावरू शकत नाही? हा महाराजांचा महाराष्ट्र आहे ना? कि विसरलात डी जे च्या गोंधळात हे पण? अहो मागच्या शिवजयंतीचा बॅनर पुढचे चार सहा महिने तसाच झळकत राहतो पण मग विचारांचं काय? उद्या 'महाराजांचे विचार त्यानलाच इचार' अशी गत व्हायला नको.
शिवजयंती आपली आहे असं आपण मानतो तर मग साजरी सुद्धा आपली असल्यासारखीच करूया. आपल्याच वागण्याने आपला देव परका होऊ देऊ नका. महाराष्ट्राला शिवरायांची गरज आहे. आणि ते आपल्यातच आहेत. तरूणरक्तात मिसळले आहेत. फक्त गरज आहे ती तुम्ही जागं होण्याची.
आज जे काही वाटलं ते लिहिलं. काही राहीलं असेल, चुकलं असेल तर माझे महाराज ते काम नव्याने हाती घेण्याची प्रेरणा देतीलच.
जय महाराष्ट्र, जय शिवराय.
                          - शुभम साळुंखे, पुणे.

Comments

Popular posts from this blog

एक हादसा ऐसा भी...

वजूद